रक्षा माझ्या मुलीसारख्या…खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, स्मिता वाघ यांची प्रतिक्रीया
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत साधारण 69 जण शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. रक्षा खडसे यांची खासदारकीची ही तिसरी टर्म आहे. त्यांना मंत्रिपद दिल्याने जळगावच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी आनंद व्यक्त केला आहे.
खऱ्या अर्थाने न्याय त्यांना मिळाला आहे. गेली दहा वर्षे त्यांनी चांगले काम केले आहे. तिच्या पुढच्या काळासाठी तिला आपण शुभेच्छा देतो असे भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले. नाथाभाऊ गेलेले असले तर रक्षा खडसे या कायम भाजपाशी एकनिष्ठ राहील्या आहेत. एकनिष्टतेचे फळ हे काय असते हे माझ्या पेक्षा आणखी कोण सांगू शकते. जळगाव लोकसभेला पहिल्यांदा तिकीट मिळाले होते त्यावेळी रक्षा खडसे यांनी माझ्याशी सल्लामसलत केली होती, मला त्या मुली सारख्या आहेत अशी प्रतिक्रीया जळगाव लोकसभेतून निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे. रक्षा यांची ही तिसरी टर्म आहे. त्यांनी दहा वर्षे चांगली कामगिरी केली आहे. आता देखील त्या चांगली करतील असेही स्मिता वाघ यांनी म्हटले आहे. नाथाभाऊ यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार देत याबद्दल वरिष्ठच योग्य ती माहीती देऊ शकतील असेही स्मिता वाघ यांनी सांगितले.