बारसू रिफायनरीवरून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात एक वाक्यता नाहीच; ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. तर आम्ही त्यांच्याबरोबर असल्याचे म्हटलं होतं.
मुंबई : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून (Barsu Refinery Project) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. तर आम्ही त्यांच्याबरोबर असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) धारेवर धरत टीका केली आहे. राऊत यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ग्रामस्थांची संवाद साधूनच पुढे जाऊ म्हणतात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र ट्विट करत आम्ही बारसू रिफायनरी रेटणार असे म्हणतात. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतमतांतर आहे. तर आधी सरकारनं बारसू रिफायनरी संदर्भात भूमिका स्पष्ट करावी. नुकसान होणार नाही यासाठी ग्रामस्थांकडे येऊन बोलायला हवं असे राऊत यांनी म्हटलं आहे.