‘भाजपने कोर्टात जावं, मी वाट बघतोय’; बावनकुळे यांच्या इशाऱ्याला राऊत यांचे प्रत्युत्तर
कालच्या सामनाच्या अग्रलेखात खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.
मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना, मुख्य चे ‘उप’मुख्यमंत्री झाल्याने फडणवीस यांची असंवेदनशीलता संपली आहे. ते अहंकाराचे महामेरू बनले आहेत. एका चांगल्या माणसाच्या झोकांड्या जात आहेत. फडणवीस, सांभाळा! असं म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला होता. तसेच सामना विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यावर आता राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे. तसेच भाजपने सामनाविरोधात कोर्टात जावं, मी वाट पाहातोय. त्यांच्याकडे वकील नसेल तर मी चांगला वकील देतो. त्यांनी कोर्टात जावंच, असं राऊत म्हणालेत. तर त्यांनी भाजपला सामना वाचनाचा सल्ला ही दिला आहे. तर वाचाल तर वाचाल असेही त्यांनी खोचक टोला लगावलाय.