एमआयडीसीच्या मुद्द्यानंतर रोहित पवार यांनी ‘या’ प्रश्नावरून वेधलं सरकारचं लक्ष; म्हणाले….
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनानंतर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा महत्वाच्या मुद्द्यावरून सरकारचं लक्ष वेधलं आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावात MIDC मुद्द्यावरून त्यांनी हे आंदोलन केलं. यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवार यांची भेट घेत आज बैठक बोलावली जाईल, असा शब्द दिला. त्यानंतर रोहित यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. आज ही बैठक होणार आहे. या बैठकीआधी रोहित पवार यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहे. ते म्हणाले की, “एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलीस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आता राज्यात भरती केली जात आहे. तर हे अत्यंत चुकीचं हा घोटाळ्याचा प्रकार आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी देता कामा नये. अन्यथा हा पायंडा पडेल. अग्निवीरांसारखं हा प्रकार आहे आणि हा चुकीचा पायंडा जर पडला त्याला सरकार जबाबदार राहील.”