‘टीआरपीसाठी काही फेकमफाक करतात’; गिरीश महाजन यांचा अंधारे यांच्या ‘त्या’ आरोपावर टोला
यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी सादर करत तब्बल १०० कोटींच्या घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी या घोटाळ्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असल्याचे म्हटलं आहे.
मुंबई | 26 जुलै 2023 : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मध्यान्ह भोजन योजनेवरून मोठा आरोप केला होता. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी सादर करत तब्बल १०० कोटींच्या घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी या घोटाळ्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असल्याचे म्हटलं आहे. यावरून राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. तर याच मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनात मध्यान्ह भोजन योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. तर या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी अंधारे यांच्यावर पलटवार करताना त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करावी चौकशी केली जाईल असे म्हटलं आहे. तर अंधारे यांच्या आरोपावरून, यावेळी आपआपली टीआरपी वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. काही ठरावीक नेते असे आहेत, ज्यांना असं वाटतं की मी टिव्हीवर सतत दिसावं. त्यामुळे ते काहीही बेताल वक्तव्य आणि ‘फेकमफाक’ करत असतात. त्यामुळे टीआरपी फक्त वाहिण्यांना नाही तर नेत्यांनाही लागू पडतो असा टोला लगावला आहे.