“…तर एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री करावं”, जय-वीरुच्या जोडीवरून सचिन खरांतांचा टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी जय-वीरु सारखी असून ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं, असं म्हटलं आहे. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी जय-वीरु सारखी असून ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं, असं म्हटलं आहे. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे. ते म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमांमध्ये बोलताना, फडणवीस आणि माझी जय-वीरूची दोस्ती आहे, असं म्हणाले. परंतु, एकनाथ शिंदे जय आणि वीरू यांनी तर ठाकूर कुटुंबासाठी एकनिष्ठपणे शेवटपर्यंत काम केले.तुम्ही तर ठाकरे कुटुंबाबरोबर काय केले, ते राज्यातील जनतेला जगजाहीर आहे. फडणवीस यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे कुरापती केल्या त्यामुळे तुमची जोडी ही जयवीरुची नाही. तरीही तुम्हाला ही जोडी जय वीरूची वाटत असेल, तर फडवणीस गेले काही वर्ष म्हणत होते मी पुन्हा येईन, हे त्यांचं स्वप्न पूर्ण करा आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा मगच आम्ही समजू ही दोस्ती जय वीरूची आहे”.