ऊन वाढलं असताना एनर्जी ड्रिंक खरेदी विक्रीवर बंदी; कुठल्या जिल्ह्यात बंदी?
कोल्हापूर जिल्ह्यात ही एका ग्रामपंचायतीने एनर्जी ड्रिंक्सच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे एनर्जी ड्रिंकचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र एनर्जी ड्रिंकमध्ये असणाऱ्या घातक घटकांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात एका लहान मुलाच्या जीवावर एनर्जी ड्रिंक्स बेतली होती. त्यामुळे त्या गावच्या ग्रामपंचायतीने थेट निर्णय घेत कॅफिनयुक्त थंडपेयांच्या विक्रीवर बंदी घातली होती. हा निर्णय वाळवा तालुक्यातील बहे ग्रामपंचायतीने घेतला होता. आता त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात ही एका ग्रामपंचायतीने एनर्जी ड्रिंक्सच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे एनर्जी ड्रिंकचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र एनर्जी ड्रिंकमध्ये असणाऱ्या घातक घटकांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सांगरूळ परिसरात अनेक तरुणांमध्ये एनर्जी ड्रिंक्सचे दुष्परिणाम दिसून येऊ लागल्यामुळे ग्रामपंचायतीने कठोर पाऊल उचलले. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ ग्रामपंचायतने गावातील दुकानात मिळणारे घातक एनर्जी ड्रिंक खरेदी करून ते गटारीत ओतून दिले. अशा घातक एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्यात आली असून असे ड्रिंक विक्री न करण्याच्या सूचना सरपंच आणि सदस्यांनी गावातील दुकानदारांना दिल्या आहेत.