VIDEO : कोकणात नाही, दुष्काळी भागात फुलवली आंब्याची बाग
डोंगर उतारावर उत्तम शेती करुन भरघोस उत्पन्न घेता येतं या शेतकऱ्याने सिद्ध केलं आहे. (Sangli Mango Farm)
सांगली : आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. कोकणात अनेक ठिकाणी आब्यांच्या बागा पाहायला मिळतात. पण दुष्काळी भागात तुम्ही कधी आंब्याची बाग पाहिली का? नाही ना… पण सांगलीतील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावातील एका शेतकऱ्याने चक्क दुष्काळी भागातील डोंगर उतारावर आंब्याची बाग फुलवली आहे. गजानन पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने एकूण 6 एकरात 1200 आंबा झाडाची लागवड केली असून या झाडांना यंदा भरघोस फळ आले आहे..
साधारण 1200 झाडांमध्ये 40 टन आंबा काढण्याचे गजानन पाटील यांचे उद्दिष्ट आहे. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर करुन ही आंब्याची बाग वाढवण्यात आली आहे. 2004 साली गजानन पाटील यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर फोंड्या माळरानावर आंब्याची बाग लावली. पूर्ण सेंद्रिय आणि नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या बागेत यावर्षी आंबा चांगलाच लागला आहे. विशेष म्हणजे हा आंबा लवकरच बाजारपेठेत दाखल होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याला चांगले उत्पन्नही मिळण्याची आशा आहे. डोंगर उतारावर उत्तम शेती करुन भरघोस उत्पन्न घेता येतं या शेतकऱ्याने सिद्ध केलं आहे.