“‘शासन आपल्या दारी’ हा मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा इव्हेंट”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसैनिकांना ताब्यात घेणं हा दडपशाहीचा प्रकार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही एका पक्षाचे नसतात. लोकशाहीला घातक असलेली, ही पद्धत महाराष्ट्रात सुरू आहे. कालची सभा अयशस्वी झाली. हा एक इव्हेंट होता. पैसे शासनाचे आणि इव्हेंट यांच्या पक्षाचा होता. ज्या पद्धतीने पैसे खर्च केले त्या प्रमाणात लोक आले नाहीत. जे काही लोक आले ते प्रशासनाच्या प्रयत्नामुळे. प्रशासनावर लोक आणण्यासाठी दबाव होता. लोकांना फसवून,दमदाटी करून, गाडीत भरून सभेच्या ठिकाणी आणले गेले”, असं संजय पवार म्हणाले. शिवसेनेच्या जाहिरतीवरही संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जाहिरातीवरच सुरू आहे. एकमेकाला चेकमेट देण्यासाठी या जाहिराती सुरू आहेत. या जाहिरातीचा स्फोट लवकरच महाराष्ट्रात होणार. जाहिरातीत शिवसेनाप्रमुखांचा फोटो असलाच पाहिजे होता. त्यांचा इतक्या लवकर विसर कसा पडला. तुमच्या किती जाहिराती झाल्या तरी महाराष्ट्राची जनता तुम्हाला धडा शिकवणारच आहे”.