“चीनला डोळे वटारून दाखवा”, मणिपूर हिंसाचारावरून संजय राऊत यांची राजनाथ सिंह यांच्यावर टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून भाजप सरकारला फटकारलं आहे. देशातील एका राज्याशी संवाद तुटणं याचा अर्थ त्या राज्यात अराजक निर्माण होणं आहे...
मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून भाजप सरकारला फटकारलं आहे. “देशातील एका राज्याशी संवाद तुटणं याचा अर्थ त्या राज्यात अराजक निर्माण होणं आहे. मणिपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका लष्करी अधिकारी ले. जनरल निशिकांत सिंह यांनी स्पष्ट सांगितलं की, मणिपूरमध्ये लिबिया, सीरियासारखी परिस्थिती सुरू झाली आहे. मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य नाही. रस्त्यावर हिंसाचार सुरू आहे. पोलीस आणि लष्कर काही करू शकत नाही. सरकार पळून गेलं आहे. सरकारनंच पलायन केलं याला अराजक म्हणतात. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी जाऊन राज्य शांत करणं गरजेचं आहे. जी माहिती येते त्यानुसार मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. चीन आत घुसला असेल. लोकांना शस्त्र पुरवत असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. पण देशाचे संरक्षण मंत्री जम्मूला जातात आणि पाकिस्तानला दम देतात. पाकिस्तानमध्ये घुसण्याची भाषा करतात. स्वागत आहे. पण तिकडे सर्व शांत आहे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री कशात काही नसताना पाकिस्तानला दम देत आहेत. चीनला डोळे वटारून दाखवा. कारण मणिपूरमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे. जा ना चीनमध्ये घुसा. पण त्याबाबत पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री बोलत नाहीत”, असं ते म्हणाले.