महाराष्ट्राची संस्कृती काय हे कुणी सांगायला नको; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
'महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, त्याची रोज कशी पायमल्ली होत आहे, हे कोणी सांगायला नको', राऊतांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवडच्या जागी विरोधकांनी महाराष्ट्राची परंपरा जपावी, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. यावेळी त्यांनी अंधेरीच्या पोट निवडणुकीचा दाखला दिला. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली नाही.
महाराष्ट्राची परंपरा आहे. अंधेरीचीही निवडणूक बिनविरोध झाली नाही. निवडणूक झाली. नांदेड, पंढरपूरच्या निवडणुकाही झाल्या. त्यावेळी मृत आमदारांच्या घरातील लोकच निवडणुकीला उभे होते. अंधेरीची निविडणूक अपवाद होता. त्याची कारणं वेगळी आहेत. शिवाय भाजपला जिंकण्याची संधी नव्हती, असं राऊत म्हणाले.
एखादा आमदार मृत पावला तर रिक्त जागेवर उमेदवार देऊ नये, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर संजय राऊच यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, त्याची रोज कशी पायमल्ली होत आहे, हे कोणी सांगायला नको, पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही ती मुंबईत दिसली होती, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.