भाजपविरोधात आता बंगळुरूत एल्गार! 2024च्या निवडणुकीबाबत भूमिका मांडणार, संजय राऊत यांनी दिली माहिती
आगामी लोगकसभा निवडणुकीसाठी देशातले विरोधक एकवटल्याचं चित्र दिसत आहे. बिहारच्या पाटण्यानंतर आता विरोधकांची बंगळुरू येथे बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
मुंबई, 16 जुलै 2016 : आगामी लोगकसभा निवडणुकीसाठी देशातले विरोधक एकवटल्याचं चित्र दिसत आहे. बिहारच्या पाटण्यानंतर आता विरोधकांची बंगळुरू येथे बैठक होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी सर्वांना बैठकीचं आमंत्रण दिलं आहे. बैठकीला सोनिया गांधी यांच्याकडून विरोधकांना डिनर दिलं जाणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांसह अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “उद्या 17 जुलै रोजी सर्व विरोधकांची बंगळुरूमध्ये बैठक होत आहे. सोनिया गांधी यांनी 17 जुलै रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी रात्रभोजनची व्यवस्था केली आहे. 18 तारखेलाही बैठक होणार आहे. यावेळी महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मी उपस्थित राहणार आहे,” राऊत म्हणाले.