“कलंकित सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हळद लावून बसले आहेत”, संजय राऊत यांचा घणाघात
उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अंगाला हळद लावून बसले आहेत. ती हळद पिवळी नसून..."
मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसीय विदर्भ दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच नागपूरचा कलंक म्हणजे देवेंद्र फडणवीस अशी टीका केली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”महाराष्ट्रात एक कलंकित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार कलंकित आहे हे आम्ही सांगत नाही तर, केंद्रीय तपास यंत्रणांनीच सांगितलं आहे. PMLA अॅक्टनुसार एखाद्या कलंकित खात्यातून गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा दुसऱ्या खात्यात गेला असेल तर ती व्यक्तीसुद्धा PMLA कायद्यानुसार गुन्हेगार ठरते. त्यानुसार, अनेक लोक गुन्हेगार आहेत. आज या सरकारमध्ये कलंकित पैसेच नाहीत तर खाती आणि त्या खात्यासह खातेदारही सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अंगाला हळद लावून बसले आहेत. ती हळद पिवळी नसून काळी आहे. एवढी कलंकित हळद आहे.”