मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरीविरुद्ध लोकांमध्ये जागृती करणाऱ्या पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या होते. हे धक्कादायक आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहविभागाचे नेतृत्व करीत असताना राज्यात खून होतायंत व संबंधित गुन्हेदारांना राजाश्रय मिळावा, हे भीषण आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात नव्हे तर ती हत्याच आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत इशारा देणारे पत्र लिहिले आहे. तसेच लवकरच मी आणि शिवसेनेतील सहकारी रत्नागिरी, राजापूर येथे जाणार आहोत, अशी माहितीही राऊतांनी दिली.