संजय शिरसाट यांना मंत्रीपदाचे वेध, म्हणाले, “संधी मिळाली तर…”
केंद्र, राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. जर मला मंत्रिपदाची संधी मिळाली तर मी त्या संधीचे सोनेच करेन.
मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे असं वाटत होतं. मात्र, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही त्यामुळे ते नाराज झाले होते. आता शिंदे सरकारमध्ये अजित पवार सामील झाले. त्या शपथविधी कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्याच आमदारांना शपथ देण्यात आली. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळात तरी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा संजय शिरसाट ठेऊन आहेत. यावर भाष्य करताना “केंद्र, राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. जर मला मंत्रिपदाची संधी मिळाली तर मी त्या संधीचे सोनेच करेन,” असे ते म्हणाले. “तसेच अजितदादा यांच्यावर कुठलाही एफआयआर नाही. मात्र, त्यांची चौकशी संपली अशातला काही भाग नाही. त्यांच्या ज्या चौकशा सुरु आहेत. त्या सुरूच राहतील. अजितदादा त्याला सहकार्यही करतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.