ज्येष्ठ सहकारी मंत्र्याने दिला छगन भुजबळ यांना सल्ला, भूमिका असताना, वाद का?
मराठा आणि ओबीसी या प्रश्नाला वेगळ्या दिशेने नेऊ नये. भुजबळ निश्चितच ओबीसी नेते आहेत. त्यांनी सभा घेऊन आव्हान द्यावे अशी ही वेळ नाही. पवार साहेबांनी 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा द्यावी. कुणाच्या अंगावर शाई फेकून याला बगल देऊ नका अशी टीका केलीय.
नाशिक | 18 नोव्हेंबर 2023 : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे काम जबाबदारीने देवेंद्र फडणवीसजी करत आहे. त्यामुळे पोलिसांना मराठा ओबीसी वाद यात ओढण्यात अर्थ नाही. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे वक्तव्य सुरू आहेत. याने मनाला वेदना होत आहेत. मंत्र्यांनी तेढ निर्माण होणारी वक्तव्यं करू नये, ही अपेक्षा आहे. सरकारची आरक्षणाची स्पष्ट भूमिका आहे असे असताना, वाद का? असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकारी मंत्री छगन भुजबळ यांना दिला. भुजबळ यांनी गावबंदी बोर्ड हटवण्याची मागणी केली. गावबंदी ही मराठ्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती. त्याचे प्रतीकात्मक बोर्ड लागले. पण, त्यावरून विधाने करणं थांबवलं पाहिजे असेही ते म्हणाले. येत्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणावर काही कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, छगन भुजबळ यांना विनंती आहे की त्यांनी अशी वक्तव्ये करू नये असे त्यांनी सांगितले.