“माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने 3 वेळा निवडून आली”, शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असं वक्तव्य केलं होते. त्या वक्तव्याला शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असं वक्तव्य केलं होते. त्या वक्तव्याला शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने तीनवेळा निवडून आलेली आहे. एखाद्यावेळेला पूर्वजांची पुण्यायी उपयोगी पडते. पण दुसरी आणि तिसरी निवडणूक आणि त्यानंतर पार्लमेंटच्या परफॉर्मन्समध्ये 98-99 टक्के अटेन्डन्स यामध्ये उच्च दर्जाचा क्रमांक आहे. तिला आठवेळा पुरस्कार मिळाला. पण मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वत:चं कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. त्यामुळे मोदींचं वक्तव्य हे अशोभणीय आहे. संसदेच्या सदस्याबद्दल असं मत व्यक्त करणं योग्य नाही. मी पंतप्रधानांची व्यक्तीगत टीका करत नाही. कारण ती इन्स्टीट्यूशन आहे. त्याबद्दल सन्मान ठेवला पाहिजे. पण इतर राज्यातील अस्वस्थता दिसून येत आहे,” असं शरद पवार म्हणाले.