‘रिक्षावाला म्हणून हिनवलं पण याच रिक्षानं तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं’; शिंदे यांचा घणाघात
शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिनाचे मेळावे पहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपापल्या गटाच्या सभेला संबोधित करताना एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला.
मुंबई : शिवसेनेच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी (१९ जून) महाराष्ट्रात जोरदार राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिनाचे मेळावे पहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपापल्या गटाच्या सभेला संबोधित करताना एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी ठाकरे गटावर हल्ला चढवला. तसेच ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. तर ठाकरे यांचा खरपूस समाचार घेताना शिंदे म्हणाले की, त्यांना कोणीतरी सांगावे की त्यांनी त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलावा. आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही आमच्या कृतीने उत्तर देतो. तर करतो, आणतो, दिसतो हे नको आहे, म्हणून आम्ही जनतेला गतिमान सरकार दिलं. हे काम करणार सरकारं आहे. तर हे रिक्षाची हेटाळणी करत होते. रिक्षावाला म्हणून हिनवत होते. मात्र याच रिक्षानं तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं असा घणाघात शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केला. सर ही सर्व सामान्य मानसाची रिक्षा आहे नादी लागू नका असा दमही त्यांनी ठाकरे यांना यावेळी दिला.