पराभवाचा वचपा काढणारच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले जलील यांना आव्हान
वंचित बहुजन आघाडीने 12 जागा मागितल्या असल्या तरी भाजपाला पाडण्यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र आल्याने वंचित बहुजन आघाडी तसेच आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल अशी भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर | 27 डिसेंबर 2023 : आपण छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिले आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी केलेल्या पराभवाचा आपण वचपा निश्चित काढू असे आव्हान त्यांनी दिले आहे. इम्तियाज जलील यांना जनता कंठाळली आहे. त्यांना आपला हक्काचा उमेदवार हवा आहे. जलील यांच्या पक्षाची अवस्था वाईट आहे. हैदराबाद येथे सगळे साफ झाले आहे. त्यांच्या कामामुळे त्यांचे अध:पतन झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 90 टक्के जनता आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे खैरे यांनी म्हटले आहे. महाआघाडीत जागांवरुन कोणतेही मतभेद नाहीत असा दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे मन वळविण्यात उद्धव साहेबांना यश येईल आणि भाजपाच्या पराभवासाठी जागा वाटपाचे मतभेद बाजूला ठेवून महाआघाडी एकत्र आली असून आमचा विजय निश्चित असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.