Chandrakant Khaire : शिवसेनेत कुरबुर! ‘दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का?’, चंद्रकांत खैरेंची नाराजी
Chandrakant Khaire - Ambadas Danve Dispute : शिवसेना उबाठा गटात संभाजीनगर येथे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात पुन्हा नाराजी बघायला मिळाली आहे. खैरे यांनी याबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमात विचारत नाहीत. मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली. अंबादास दानवे आत्ता आले आहेत, असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे. यावेळी त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधल्याने पुन्हा एकदा खैरे – दानवे यांच्यातील वादाची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमात बोलवत नाही, काही प्लॅनिंग करत नाही. मी पण शिवसेनेचा सुरुवातीपासूनचा नेता आहे. दानवे आत्ता आलेत. पण मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली. काही करायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग आपण एकत्र बसून केलं पाहिजे. अंबादास दानवे काय खूप मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? आता ऑगस्टपर्यंत आहे, तोवर चालू द्या त्यांना, अशी नाराजी यावेळी बोलताना खैरेंनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हंटलं की, चंद्रकांत खैरे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्यावर काहीही बोलणार नाही. दर आठ दिवसाला मी खैरे यांच्याकडे जातो. त्यांना भेटतो, आशीर्वाद घेतो. अशात मी कोणत्याही कार्यक्रमाच आयोजन देखील केलेलं नाही. माझ्या घरी लग्नकार्य होतं तेव्हा मी स्वत: त्यांना घ्यायला गेलो होतो. स्वत: गाडीतून फिरवलं होतं. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात कोणाचा मानपान नसतो, असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलं आहे.