Sanjay Raut : भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले
Sanjay Raut Criticized CM Fadnavis : कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीस यांना औरंगजेब म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी देखील फडणवीस आणि भाजप सरकारवर याच मुद्द्यावरून हल्ला चढवला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एखादा देखावा किंवा चित्र निर्माण केलं असेल तर त्यात पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची गरज काय आहे? असा प्रश्न उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. कल्याणमध्ये देखाव्यावर केलेल्या कारवाईनंतर आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केलं.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पॉडकास्ट पोलिसांनी ऐकायला हवा. त्यात त्यांनी टीका सहन केली पाहिजे असं म्हंटलं आहे. त्यामुळे पोलिसांवर देखील टीका झाली तर त्यांनी ती सहन करायला हवी. मात्र आता पोलिसांनी बंडखोरी केलेली दिसते आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे. भाजपची राज्य करण्याची पद्धत ही कपट आणि कारस्थानी आहे. अत्यंत घृणास्पद पद्धतीने त्यांनी कपट आणि कारस्थान राजकारणात आणलं आहे. देशातील राजकारणात असलेला सुसंस्कृतपणा भाजपने घालवला आहे. राज्यात देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्माण केलेला पॅटर्न आम्ही अनुभवला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल संताप आहे. राज्याच्या कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीस यांना औरंगजेब म्हंटलं आहे. पण असं म्हणायची वेळ का आली? याचे आत्मचिंतन आता फडणवीस यांनी करायला हवे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.