दोन शेतकऱ्यांना रडवण्याचं अन् दोघांना हसवण्याचं काम सरकारने करू नये, त्यापेक्षा…; कांदा उत्पादक आक्रमक
Solapur News : सरसकट सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान द्यावं, अशी मागणी सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाहा...
सोलापूर : सोलापुरमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आक्रमक शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या तीनशे रुपये अनुदानावर आम्ही समाधानी नाही. कांद्याला किमान 500 ते 700 रुपये अनुदान दिलं तरच आम्हाला त्याचा फायदा होईल. कांद्याला तीनशे नव्हे तर किमान 500 ते 700 रुपये अनुदान द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने कांद्याला तीनशे रुपये सानुग्रह अनुदान घोषित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कांद्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय, मात्र घोषित केलेलं अनुदान तुटपुंजे मिळत आहे. काही शेतकऱ्यांना अनुदान दिले, काहींना नाही. असे शासनाने करू नये. दोन शेतकऱ्यांना रडवण्याचं अन् दोघांना हसवण्याचं काम सरकारने करू नये, त्यापेक्षा सरकारने सरसकट अनुदान द्यावं, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.