Special Report | राज ठाकरेंना आलेल्या धमकीवर शिवसेनेला शंका-tv9
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली...त्याची तक्रार बाळा नांदगावकरांनी गृहमंत्र्यांकडे केली. मात्र या धमकीच्या पत्राला संजय राऊतांनी स्टंटबाजी म्हटलंय..
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली…त्याची तक्रार बाळा नांदगावकरांनी गृहमंत्र्यांकडे केली. मात्र या धमकीच्या पत्राला संजय राऊतांनी स्टंटबाजी म्हटलंय.. लालबागच्या कार्यालयात, राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र, आल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी राज्य सरकार सुरक्षेवर गंभीर नसून केंद्रानं राज ठाकरेंना सुरक्षा देण्याची मागणी केली. पण अशा धमकीचे शकडो पत्र रोज शिवसेना भवनात येतात, अशी बोचरी टीका करुन राऊतांनी राज ठाकरेंनाच डिवचलंय. मनसेच्या गजानन काळेंनी, आता संजय राऊतांनाच स्वत:ची सुरक्षा काढून फिरण्याचं आव्हान दिलं. सध्या संजय राऊतांना मुंबई पोलिसांची Y+ सुरक्षा आहे. संजय राऊतांनी राज ठाकरेंना आलेल्या धमकीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. पण गृहखातं धमकीच्या पत्राची दखल घेईल, असं अजित पवार म्हणालेत.
कोणाला कोणती सुरक्षा द्यावी याचा निर्णय समितीचं घेते असं अजित पवारांनी म्हणतायत. मात्र राज ठाकरेंना केंद्रानं सुरक्षा द्यावी अशी मागणी बाळा नांदगावकरांनी वारंवार केलीय. तसंही अयोध्या दौऱ्यात राज ठाकरेंना झेड सुरक्षा मिळेल, अशी चर्चा आहेच. पण केंद्राची झेड सुरक्षा मिळालीच, तर ती सुरक्षा कशी असेल तेही पाहुयात…झेड सुरक्षेत एखाद्या व्यक्तीला 22 CISFच्या जवानांचं कवच असतं. 4 ते 5 एनएसडी कमांडो सुद्धा असतात. झेड सुरक्षा धारक व्यक्ती जिथं जाईल तिथं त्याच्यासोबत एक एसस्कॉर्ट गाडीही असते. सूत्रांच्या माहितीनुसार, झेड सुरक्षेचा महिन्याचा खर्च 60 लाख इतका आहे. राज ठाकरेंच्या सुरक्षेवरुन सध्या चर्चाच सुरु आहेत..प्रत्यक्ष निर्णय राज्य किंवा केंद्र सरकारच घेईल.