मंत्रिमंडळ विस्तारावरून काय सुरूय? राऊत यांनी स्पष्टच सांगत केली अजित पवार, शिंदे गटावर टीका
याचदरम्यान दिवसेंदिवस लांबणीवर जाणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तार आणि न होणाऱ्या खाते वाटपावरून शिंदे गट, भाजप आणि आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर आळवला जात आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा आज तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. मात्र काही कारणाने तो पुन्हा पुढे ढकलला गेला आहे. आता हा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान दिवसेंदिवस लांबणीवर जाणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तार आणि न होणाऱ्या खाते वाटपावरून शिंदे गट, भाजप आणि आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर आळवला जात आहे. यावरूनच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारसह केंद्रातील भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. यावेळी त्यांनी, केंद्रातील भाजप नेते हे राज्यातील हे सत्तेचं नाटक मजा घेऊन पाहत आहेत. तर त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा अपमान करण्याचा छंद असल्याची टीका केली आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीत फेऱ्या का होतात? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करताना राज्यातील नेत्यांना दिल्लीत फायधूळ झाडावी लागते असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.