VIDEO | ‘गुन्हेगार, दंगेखोर, बलात्कारी यांच्यावर कारवाई करताना फडणवीसांच्या हाताला लकवा मारतो का?!’ काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या लाठीहल्ल्यावरून आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले असा हल्लाबोल केला आहे. तर वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबई : आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. त्यावरून काँग्रेसने सरकारवर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या लाठीहल्ल्यावरून आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले असा हल्लाबोल केला आहे. तर वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागत पटोले यांनी, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे. या राज्यात दररोज गुन्हे घडत आहेत पण गृहमंत्रीपदावरील व्यक्तीला त्याची जरीही चाड नाही. वारकऱ्यांवरील लाठीहल्ला हा भक्तांचा व विठुरायाचा घोर अपमान करण्याचा प्रकार आहे. वारीचे नियोजन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास झाले आहेत तरीही त्यांना खुर्ची सोडवत नाही पण त्यांच्या खुर्चीच्या मोहात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासला जात आहे. 10 ठिकाणी दंगली झाल्या. शिंदे सरकार व या सरकारमधील गृहमंत्री फडणवीसांना ते दिसत नाही. शिंदे- फडणवीसांचे पोलीस फक्त विरोधकांवर कारवाया करण्यात तत्पर आहेत. गुन्हेगार, दंगेखोर, बलात्कारी यांच्यावर कारवाई करताना फडणवीसांच्या हाताला लकवा मारतो काय? असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे.