Nagpur Violence : राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
Nagpur Violence Updates : नागपूर शहरात काल झालेल्या हिंसाचारानंतर आज तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे. पोलिसांकडून याठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला असून 11 भागात संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून काल झालेल्या राड्यानंतर आज तणावपूर्ण शांतता आहे. याठिकाणी नागपूर शहरातल्या 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कालच्या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलेली होती. त्यामुळे आज शहरात शांतता असली तरी तणाव मात्र कायम असल्याचं बघायला मिळालं आहे.
नागपूर शहराच्या संचारबंदी लागू करण्यात आलेल्या 11 पोलीस ठाणा हद्दीच्या एन्ट्री पॉइंटवर नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. यात तहसील, गणेशपेठ, कोतवाली, पाचपावली, लकडगंज, शांतीगंज, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर, कपील नगर या ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सर्वच सीपी, एसपी यांची व्हिसी घेऊन राज्यभर कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेत.