सुप्रीम कोर्टात वारंवार दाखला दिला जातोय, ते सादिक अली प्रकरण काय?
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे खटल्यात सुप्रीम कोर्टात आज वारंवार सादिक अली केसचा दाखला दिला गेला. ते नेमकं प्रकरण काय होतं, याविषयी थोडक्यात-
सुनिल काळे, नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टात (Supreme court) आज शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खटल्यात दोन्ही पक्षांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय. यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल (Niraj Kaul) यांच्याकडून वारंवार सादिक अली खटल्याचा दाखला दिला जातोय. हे प्रकरण काँग्रेसमधील अंतर्गत फुटीचं होतं. त्यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात एक गट सुप्रीम कोर्टात गेला होता. त्यानंतर 1969 मध्ये काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. इंदिरा गांधी विरोधकांचा काँग्रेस ऑर्गनायझेशन गट स्थापन झाला. तर इंदिरा गांधींच्या समर्थकांचा काँग्रेस रिक्विझिशन गट स्थापन झाला. इंदिरा गांधी यांचा फुटीर गट खरी काँग्रेस असल्याचा निकाल दिला गेला. आयोगाच्या निर्णयाविरोधात विरोधक सुप्रीम कोर्टात गेले. सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं दोन निकष दिले. पहिला निकष बहुमताचा होता. तर लक्ष्य आणि उद्दिष्टांची चाचणी हा दुसरा निकष काढण्यात आला. बहुमताच्या जोरावर कोर्टाचा निकाल इंदिरा गांधी यांच्या बाजूने गेला. त्यानंतर इंदिरा गांधींच्या गटाची भारतीय काँग्रेस म्हणून घोषणा करण्यात आली.