‘विरोधकांचे नामोहरण कण्यासाठीच सत्तेचा वापर’; गृहमंत्री फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाच्या महिला नेत्याची टीका
नितेश राणे यांनी ठाकरे यांचा हिजड्यांचे सरदार असा उल्लेख केला होता. त्यावरून पुण्यात तृतीयपंथींनी आंदोलन करत राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. तसेच बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं.
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी खालच्या पातळी जाऊन टीका केली होती. तर नितेश राणे यांनी ठाकरे यांचा हिजड्यांचे सरदार असा उल्लेख केला होता. त्यावरून पुण्यात तृतीयपंथींनी आंदोलन करत राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. तसेच बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्यासाठी तृतीयपंथीय आंदोलनकांना ताब्यात घेतलं. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी अंधारे यांनी, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणत विरोधकांचे नामोहरण करण्यासाठी गृहमंत्री फडणवीस आपली ताकद वापरतात. तर राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू असून भाषेचा स्तर घसरला जातोय अशी टीका केली आहे. तर निलेश राणे आणि नितेश राणे हे त्यांचे संस्कार दाखवत आहेत. ते वारंवार तृतीयपंथीय समूहाला टार्गेट करत अभद्र आणि अक्षम्य टिपण्णी करत आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे.