बुलढाणा : सहा दिवसांनंतर अकोला कारागृहातून जामिनावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची सुटका झाली. अकोला कारागृहातून सुटका झाल्यानंतर ते थेट बुलढाण्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या चरणी दर्शनासाठी दाखल झालेत. संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन अशी प्रार्थना करणार की, राज्यातील राज्यकर्त्यांना सद्बुद्धी मिळो. बळीराजा सुखी होऊ देत यासाठीही गजानन महाराजांना साखडं घालणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. कापूस आणि सोयाबिनला चांगला भाव मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांच्यावर पोलिसांनी लाठी चार्ज केला. यानंतर रविकांत तुपकर यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे. या रविकांत तुपकरला हजार वेळा जरी तुरूंगात टाकलं तरी आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांसाठी कितीही वेळा तुरुंगात जायला तयार आहे. शेतकऱ्यासाठी मला भगतसिंग व्हायचंय, मला फासावर जायचंय, असे ते म्हणाले.