किशोरी पेडणेकर यांच्यानंतर ठाकरे गटाचा ‘हा’ दुसरा नेता अडचणीत, आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
VIDEO | ठाकरे गटाचे लागोपाठ दोन नेते सापडले अडचणीत, आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी, काय आहे प्रकरण?
मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ | कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता ठाकरे गटाचा मोठा नेता अडचणीत सापडला आहे. माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. सध्या वायकर हे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. वायकर हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरू आहे.