‘शरद पवार या एका नावामुळेच तुम्हाला…’; राऊत यांनी थेट वळसे-पाटील यांना आरसाच दाखवला
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टीका केली. त्यांनी पवार यांच्याकडे बोट दाखवत त्यांना राज्यात राष्ट्रवादीची एकहाथी सत्ता आणता आली नाही, की पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही अशी टीका केली होती.
मुंबई : 21 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अजित पवार गटाचे नेत्यांकडून टीका होत आहे. आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील सहकार मंत्री तथा अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी टीका केली. त्याला ठाकरे गटाकडून थेट प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत वळसे पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. तर तुम्हाला जी मंत्रीपद आणि प्रतिष्ठा मिळाली ती फक्त शरद पवार यांच्यामुळेच असं सुनावलं आहे. वळसे पाटील म्हणतात की साहेबांनी कधीच स्वबळावर सत्ता आणली नाही किंवा मुख्यमंत्री केला नाही. पण साहेबांच्या नावावर तुम्ही निवडून आलात. शरद पवार हे महाराष्ट्राचे देशाचे प्रमुख महत्वाचे नेते आहेत. आतापर्यंत त्यांच्या सहकार्यांना जे काही पद आणि सत्ता प्राप्त झालीत ती शरद पवार या एका नावामुळेच आणि त्यांच्या प्रतिष्ठेमुळेच प्राप्त झाली. नाहीतर आर आर पाटलांसारखा साधा कार्यकर्ता हा या राज्याचा उपमुख्यमंत्री गृहमंत्री होऊ शकला नसता.