डबकं शोधायचं आणि उडी मारायची हाच उदय सामंत यांचा धंदा, ठाकरे गटाच्या नेत्याचा निशाणा
VIDEO | शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत पक्षबदलू माणूस, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
रत्नागिरी : शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सभेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची सभा किंवा उद्धव ठाकरेंच्या सभेत कोणतीही वैचारिक पातळी नसते तर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठीच सभा असते. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, उदय सामंत यांच्या सारख्या पक्ष बदलू माणसाने उद्धव ठाकरे यांना शहापणा शिकवणे हा एक प्रकारे विनोदच आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं डबके शोधायचे आणि उडी मारायची हाच उदय सामंत यांचा धंदा असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. तर आज संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिली जाहीर सभा होत आहे. संयुक्त होणाऱ्या महाविकास आघाडीची होणारी राज्यातील आजची सभा ही लाखाची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन कार्यकत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. तीन पक्षाचे नेते पहिल्यांदाच या महासभेत येणार असून पुढच्या विजयासाठीची वज्रमुठ आवळली जाणार असून लाखो लोकांच्या उपस्थितीत ही सभा यशस्वी होईल, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.