ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय ठरलं? अंबादास दानवे म्हणाले…
आज शिवसेना भवनमध्ये ठाकरे गटाची महत्वाची बैठक पार पडली. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. आजच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
मुंबई :
आज शिवसेना भवनमध्ये ठाकरे गटाची महत्वाची बैठक पार पडली. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. आजच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली. ‘आजच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती सर्व जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकांपर्यत पोहोचवा’, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. ‘तसेच यंदाही 18 जूनचा शिवसेनेचा वर्धापनदीन जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्यात तालुका, जिल्हा पातळीवरील शिवसैनिक येतील’, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या आजच्या बैठकीत सर्व जिल्हाप्रमुखांना, संपर्कप्रमुखांना सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन त्यातील महत्त्वाचे ठळक मुद्दे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा आदेश दिला. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे निकालावरून संभ्रम निर्माण करत असल्याचं ठाकरे गटाच्या बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.