ठाकरेंनी हॉस्पिटलमध्ये बसून माझ्या मुलाविरोधात कट रचला, रामदास कदम यांचा आरोप
दापोली येथे आज शिवसेनेची सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी रामदास कदम आणि आमदार सिद्धेश कदम यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी दापोलीत याच ठिकाणी भाड्याची माणसे न आणत एवढी मोठी सभा घेऊन दाखवावी असे आव्हानच रामदास कदम यांनी यावेळी दिले.
दापोली | 9 मार्च 2024 : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर कठोर भाषेत टीका केली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा वारंवार उल्लेख केला. आपला मुलगा योगेश दादा याचे राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आजारी असतानाही हॉस्पिटलमधून कट रचल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. आपल्याच आमदारांना संपवणारा हा एकमेव गद्दार नेता आहे, अशी सडकून टीका रामदास कदम यांनी केली. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची यावेळी त्यांनी तोंडभर स्तुती केली. एकनाथ शिंदे असताना तटकरे यांच्या तिकीटाची कुणी काळजी करू नये असेही ते म्हणाले. तटकरे तुम्ही सर्वाधिक मतांनी निवडून येणार आहात. कोण गिते ? त्यांना आम्हीच सहावेळा निवडून दिले. निवडून गेल्यानंतर ते पुन्हा पाच वर्षे दिसत नाहीत. पुन्हा दिसले की समजायचं निवडणूक आली. त्यांनी मराठा आणि कुणबी जाती वाद केला. कुणबी समाजाच्या 200 मुलांना नोकऱ्या दिल्याचं त्यांनी दाखवून दिलं तर मी राजकारण सोडेन असे त्यांनी सांगितले.