सत्तेत असणाऱ्या भाजप-शिंदे गटात रेल्वे स्थानकाच्या नावावरून वाद; काय आहे प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये नवी मुंबईतील ऐरोली-कळवा एलिव्हेटेड पुल आणि दिघा रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. एमआरव्हीसीच्या माध्यमातून दिघा रेल्वे स्थानकाचे कामाची पूर्तता झाली आहे.
मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दिघे ठेवण्यात आले आहे. यावरून मुळ ओळख न पुसता आहे तेच नाव देण्यात यावं अशी मागणी स्थानिकांची असताना त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. या स्थानकाचे नाव बदलण्यावरून भाजप आणि शिंदे गटामध्येच आता वाद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये नवी मुंबईतील ऐरोली-कळवा एलिव्हेटेड पुल आणि दिघा रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. याचदरम्यान दिघा की दीघे? यावरून आता वाद सुरू आहे. तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी नाव कोणतेही असो जनतेसाठी रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा अशी मागणी केली आहे. तर भाजपमध्ये दाखल झालेले माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी ‘दिघागांव’ची ओळख पुसली जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत दिघागाव हे नाव न दिल्यास उदघाटन होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. तर जिल्हाधिकारी यांच्यासह रेल्वे बोर्डाने दिघे रेल्वे स्थानक नाव ठेवून नव्या वादाला तोंड फोडले आहे.