अखेर डोळ्याचे पारणे फेडणारा सहस्त्रकुंड धबधबा झाला प्रवाहीत; नागरिकांची मोठी गर्दी
वर्षा सहलीवर अनेक जण हे धबधब्यावर जाणे पसंत करतात. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने अनेक धबधबे हे कोरडे पडले होते. मात्र आता जूनच्या शेवट्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे राज्यात अनेक भागातील धबधबे हे प्रवाहीत झाले आहेत.
नांदेड : मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पावसाने जून महिन्यात दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह वर्षा सहलीवर जाणाऱ्यांची चिंता वाढली होती. वर्षा सहलीवर अनेक जण हे धबधब्यावर जाणे पसंत करतात. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने अनेक धबधबे हे कोरडे पडले होते. मात्र आता जूनच्या शेवट्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे राज्यात अनेक भागातील धबधबे हे प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक हे धबधब्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. अशाच गर्दीने सध्या मराठवाडा सीमेवरील हिमायतनगरपासून 15 किमी अंतरावरील सहस्त्रकुंड बाणगंगा धबधबा फुलला आहे. हा धबधबा पैनगंगा नदीवर असून तो शनिवारी दुपारपासून खळखळला आहे. मागील वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात धबधबा सुरू झाला होता. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्याने पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यास जात आहेत. तत्पूर्वी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानेही धबधब्याला काही काळ खळखळला होता.