घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा, 21 हून अधिक तंतूवाद्य गणेश चरणी
तंतुवाद्याचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या मिरजमधील एका कुटुंबाने 21 हून अधिक तंतुवाद्ये आकर्षक रीतीने मांडून गणरायासमोर देखावा तयार केलाय. प्रत्येक वाद्यासमोर त्याचं नाव दिले असून त्याची दुर्मिळता सांगण्यात आली आहे. ही वाद्ये जरी प्रतिकृती स्वरूपात असली तरी ती मूळ वाद्यांप्रमाणेच वाजवताही येतात हे विशेष .
सांगली : 25 सप्टेंबर 2023 | मिरजेत शनिवार पेठेतील शनिवार पेठेतील सतारमेकार गल्लीजवळ फुटाणे कुटुंब राहतात. फुटाणे कुटुंबीयांनी यंदा तंतुवाद्यांच्या प्रतिकृतीवर आधारित देखावा आपल्या घरगुती गणेशोत्सवात सादर केलाय. त्यातून मिरजेच्या समृद्ध अशा तंतुवाद्य निर्मिती परंपरेची ओळख होते. 21 हून अधिक तंतुवाद्ये येथे आकर्षकरित्या मांडण्यात आली आहेत. तंतुवाद्यांवर आधारित देखावा डॉक्टर मेघना फुटाणे व डॉक्टर केतन फुटाणे यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. गणेशाच्या मूर्ती भोवती या तंतुवाद्याची आकर्षक मांडणी केली आहे. प्रत्येक वाद्यावर समोर त्याचं नाव दिले असून त्याची दुर्मिळता सांगण्यात आली आहे. ही वाद्य जरी प्रतिकृती स्वरूपात असली तरी ती मूळ वाद्यांप्रमाणेच वाजवताही येतात. या वाद्यांमध्ये दिलरुबा, सारंगी सूरसिंगार, रुद्रिविणा, सतार, तानपुरा, भजनीविणा, सरोद यांसारख्या विविध वाद्यांचा समावेश आहे.