‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीप, उपविजेत्याला ट्रॅक्टर; आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार
माती व गादी या दोन विभागांत खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये ४५ जिल्हे व शहर यांच्यामधील जवळपास ९०० कुस्तीपटू जेतेपद पटकावण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत.
पुणे : महाराष्ट्राच्या लाल मातीचा बाणा मानल्या जाणाऱ्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आजपासून पुण्यात सुरू होणार आहे. पुण्यातील कोथरूड येथे कुस्तीच्या फडास आजपासून सुरू होणार आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा कोण उंचावणार? याकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील कुस्तीप्रेमी व कुस्ती क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
माती व गादी या दोन विभागांत खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये ४५ जिल्हे व शहर यांच्यामधील जवळपास ९०० कुस्तीपटू जेतेपद पटकावण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. भव्यदिव्य स्पर्धेमध्ये १० कोटींच्या बक्षिसाचा वर्षावही करण्यात आला आहे.
तर ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला महिंद्रा थार जीप व रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना ‘येजडी जावा’ ही मोटारसायकल व रोख बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यानाही बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य व अंतिम लढतीची चुरस पाहायला मिळणार आहे.