Kolhapur Violence : तणाव! जमावानं कायदा हातात घेतला; पोलीस आदोलकांत चकमक; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी विशिष्ट घरे, दुकानांवर दगडफेक केल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जबरोबरच अश्रूधुराचा वापर केला आहे. सध्या शहरात एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
कोल्हापूर : येथे शहरातील काही अल्पवयीन तरूणांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. तसेच मोर्चा काढणार असल्याचंही हिंदुत्ववाद्यांनी जाहीर केलं. तर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आधीच जमाव बंदीचे आदेश लागू केले होते. मात्र, त्यानंतर शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी विशिष्ट घरे, दुकानांवर दगडफेक केल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जबरोबरच अश्रूधुराचा वापर केला आहे. सध्या शहरात एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, कोणीही कायदा हातात घेऊ नये. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. तर शासन जी माहिती देईल, तिच खरी मानावी. इतर कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नये.