चोरट्यांनी केलं थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या आईलाच लक्ष; पवार यांच्या मातोश्रीची सोनसाखळीवरच मारला हाथ
नाशिक शहरात सध्या चोरट्यांनी आणि सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तेथे नागरिक या चोरांमुळे हैराण झाले आहेत. त्यातच आता पोलिसांच्या समोरच मोठं आव्हान चोरांनी उभं केलं आहे.
नाशिक : 20 ऑगस्ट 2023 | नाशिक शहर आणि परिसरात सध्या सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तर सोनसाखळी चोरांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. यातच सोनसाखळी चोरट्यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या आईलाच लक्ष केल्याची घटना घडली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचले. काल सायंकाळी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरटीओ रोडवर ही घटना घडली. शांताबाई बागुल या भाजीपाला घेऊन पायी जात असताना, त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या संशयित चोरट्यांनी बागुल यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी खेचली. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.