‘कितीही छळले तरी झुकेगा नही’, फसवणारे ते जवळचे मित्र कोण? खडसे यांनी जाहीर केली ‘या’ नेत्यांची नावे
देशातील एकमेव उदाहरण आहे की अटक न करता मला जामीन मिळाला. ही यांना चपराक आहे. IT रेड घातल्या पण त्यात त्यांना काही मिळाले नाही. ईडीच्या हाती काही लागलं नाही. महसूलमंत्री आता एक एक प्रकरण बाहेर काढत आहेत. माझ्याबद्दल काही मिळत नाही म्हणून वेगवेगळ्या नोटीस पाठवत आहेत.
पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात मुंबई न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला. त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपल्या जवळच्या मित्रांनी फसवले अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसानंतरच एकनाथ खडसे आणि त्यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांना 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आलीय. गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी हा राजकीय षड्यंत्राचा भाग आहे असे म्हटलंय. ‘मी NCP मध्ये आल्यामुळे छळले जात आहे. त्यांना वाटते की मी कंटाळून भाजपमध्ये येईल. मी कायम विरोधात राहिलो आहे त्यामुळे मला कितीही छळले तरी नाथा भाऊ झुकेगा नही,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘आमच्या गावचे विरोधकांचे एक चम्पू आहे. चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांचा यात सहभाग आहे’, असे खडसे म्हणाले.