“महाराष्ट्रभर फिरणं बंद कर, नाहीतर…”; रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी
अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर रवी राणा यांना देखील धमकीचा फोन आला.
अमरावती: अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर रवी राणा यांना देखील धमकीचा फोन आला. “तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर, नाहीतर तुझ्या जीवाचे काहीतरी करून टाकू,”असा धमकीचा फोन रवी राणा यांना आला आहे. याबाबत रवी राणा यांच्या स्वीय सहाय्यकाकडून अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार रवी राणा यांना औरंगाबाद येथील अर्जुन लोखंडे नावाच्या व्यक्तीकडून जीवे धमकी आल्याचा आरोप आहे. “तू आमच्या विरोधात कसा काय बोलतो, एवढ्या वेळेस थांब नाहीतर तुला संपवून टाकतो.इतकंच नाही, तर तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर. नाहीतर तुझ्या जीवाचे काही तरी करून टाकू.अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको,” अशी धमकी देण्यात आली आहे.