यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे 3 ‘सेनां’मध्ये रंगणार मुकाबला, मराठी मतं विभागणार?
मुंबईत यंदा पहिल्यांदा दोन शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा तीन सेना एकमेकांच्या विरोधात लढणार आहे. त्यामुळे अनेक भागात मराठी मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होऊन अमराठी मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुंबईतील ३६ जागांवर कोण किती जागांवर लढणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर या फक्त दोन जिल्ह्यातून तब्बल ३६ आमदार विधानसभेत पोहोचतात. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचाही मुंबईत मोठा भर असणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबईच्या फॉर्म्युल्यात महायुतीमध्ये सर्वाधिक भाजप १७ ते १७, एकनाथ शिंदे यांची शिवसेना १५ ते १६, अजित पवार यांची राष्ट्रवादी २ ते ३ जागा लढण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना २२, काँग्रेस १० आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी २ आणि इतरांना दोन जागा दिल्या जातील. दरम्यान, २०१९ मध्ये मुंबईत शिवसेनेने १९ जागा लढवल्या होत्या त्यापैकी १३ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपने १७ जागा लढवून १६ आमदार मिळवले होते. आघाडीमध्ये काँग्रेसने २९ जागा लढवून ०४ जागा जिंकल्या यासोबतच राष्ट्रवादीने ६ जागा लढवून १ जागा जिंकली. तर सपा ने १ जागा लढवून १ विजय मिळवला होता. मात्र यंदा मुंबईत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.