दोन राजे आले एकत्र, निमित्त ठरले शिवेंद्रसिंह राजे यांच्या वाढदिवसाचे
सातारा येथील राजघराण्यातील राजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले आज बऱ्याच काळाने एकत्र आले. निमित्त ठरले शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे. यावेळी दोघांमधील मजेशीर संवादाने उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. दोन्ही राजेंना एकत्र पाहून सातारकर सुखावले.
सातारा : सातारकरांना आज आगळंवेगळं दृश्य दिसले. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हा योग जुळून आला, शिवेंद्रराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठे बंधू उदयनराजे भोसले आले. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंह राजे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांना वाकून नमस्कार केला. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवूनच मीडियाशी संवाद साधला. बऱ्याच काळानंतर दोन्ही राजेंना अशा पद्धतीने एकत्र आलेले पाहून सातारकरही भारावून गेले. लहानपणी याच्यामुळे काकींचा आपण मार खाल्ल्याचे यावेळी उदयनराजे यांनी तक्रार करीत सांगितले. यावेळी दोघांमध्ये मजेशीर संवाद झाले. याचं काय तळ्यामळ्यात चाललंय माहीत नाही, वरुन लवकर निर्णय व्हायला हवा, मग आम्ही प्रचाराला लागतो असे शिवेंद्रसिंह राजे यावेळी म्हणाले. मी छोटा माणूस माझी झेप सातारा, जावळी पलिकडे नाही असेही ते म्हणाले. तेव्हा उदयनराजे म्हणाले की छोटा कुठे उंचीला तर बरोबर लागतोस. त्यावेळी ते बुट घातल्यामुळे असे शिवेंद्रराजे म्हणताच पुन्हा हशा पिकला. यावेळी माझ्याकडे याआधी अनावधानाने ज्या चुका झाल्या त्याबद्दल माफी मागणार नाही दिलगिरी व्यक्त करतो असे उदयनराजे म्हणाले. तर यांच्या आशीवार्दामुळे दहा हत्तीचं बळ मिळाल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले.