शिवसेना भवनानंतर आता येथेही लागले मनसेचे बॅनर्स, उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याची मागणी
राज्याला आता एक चांगल्या पर्यायाची गरज आहे. त्यासाठी मतदार आणि नेते मागणी करताना दिसत आहेत. अजित पवार यांनी निर्माण केलेल्या गोंधळानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून मनसे नेत्यांकडूनच मनधरणी केली जात आहे
कल्याण : राज्यातील सत्ता केंद्र असणारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यात उभी फूट पडली आहे. त्यामुळे राज्याला आता एक चांगल्या पर्यायाची गरज आहे. त्यासाठी मतदार आणि नेते मागणी करताना दिसत आहेत. अजित पवार यांनी निर्माण केलेल्या गोंधळानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून मनसे नेत्यांकडूनच मनधरणी केली जात आहे. मनसे नेत्यांकडून बॅनर्स लावले जात आहेत. दोन दिवसांपुर्वी असे बॅनर्स दादर येथे शिवसेना भवनाच्या बाहेर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले होते. त्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आता कल्याणमध्येही बॅनरबाजी पहायला मिळत आहे. येथे मनसेच्या माजी नगसेविका मिनाक्षी डोईफोडेंकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही दोघं एकत्र या! हिच योग्य वेळ असल्याचं यातून म्हटलं आहे. त्यामुळे आता या वाढत्या मागणीवर नेते विचार करणार का? वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणतात तसे एक राजकिय भूकंप झाला आता दुसरा होणार का? आणि जर झाला तर तो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा असेल का? हे पहावं लागेल.