‘पोलिस महासंचालिकांना महाराष्ट्राची लाडकी बहीण व्हायची असेल…, ‘ काय म्हणाले उद्धव ठाकरे
बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेला आणि पोलिसांना देखील आवाहन केले आहे.
महाविकास आघाडीने उद्या शनिवार 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या संदर्भात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पोलिस महासंचालकांनाच आवाहन केले आहे. ते म्हणाले की हिंसा होऊ नये ही इच्छा आहे. पोलीस महासंचालिका महिला आहेत. त्या पहिल्या महिला संचालिका आहेत. त्यांना संधी आहे. त्या महाराष्ट्राची लाडकी बहीण होऊ शकतात. बंदच्या आड त्यांनी येऊ नये, असे आदेश पोलीस महासंचालिका आपल्या पोलिसांना देऊ शकतात. बाकी मुख्यमंत्री रक्षा बंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात. कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मते देण्यासाठी आहेत. बहिणीची किंमत ही मतं आहे. पण आमच्यासाठी बहीण हे नातं आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. तुम्हाला वाटत असेल बहिणींची मते विकत घेऊ शकता तर माझ्या महाराष्ट्राच्या बहीणी एवढ्या विकाऊ नाहीत.बंद हा बंद असतो. नागरिकांना विनंती करतोय बंदमध्ये सहभागी व्हा. उच्च न्यायालयाने देखील बदलापूरच्या घटनेची दखल घेतली आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.