कंस मामा राजीनामा द्या…उद्धव ठाकरे यांचे सेनाभवनासमोर भर पावसात निषेध आंदोलन
शनिवारच्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवित जर बंद पुकारला तर कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिले, त्यामुळे हा बंद रद्द करीत महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
बदलापूर अत्याचार प्रकरणात महाविकास आघाडीने आज 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या महाराष्ट्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तातडीने याचिका दाखल करुन लागलीच उच्च न्यायालयाने दुपारच्या जेवणानंतर सायंकाळी चार वाजता बंद बेकायदेशीर ठरविला आणि त्यावर बंदी घातली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते शरद पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत बंद मागे घेण्याची विनंती केली. अखेर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करीत आपण उद्या काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. आज शनिवारी सकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनाजवळ सरकारचा निषेध करणारे आंदोलन केले. यावेळी पाऊस सुरु होता, तरीही शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा केल्या. एकनाथ शिंदे यांचा कंस मामा असा उल्लेख करीत कंस मामा राजीनामा द्या…राजीनाम द्या अशा घोषणा करण्यात आल्या. या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय, शक्ती कायदा झालाच पाहीजे.. आरोपीला फाशी द्या…फाशी द्या…अशा घोषणा यावेळी शिवसैनिक कार्यकर्त्यांनी केल्या.