उडता पंजाब झाला, आता उडता महाराष्ट्र होणार का ? सुप्रिया सुळे यांची टीका
शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही अशी टीका राज ठाकरे यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांना चाळीस वर्षांनी शिवाजी महाराजांची आठवण आली का ? अशी टीका काल केली होती. राज्यात फेब्रुवारीतच पाण्याची टंचाई सुरु झाली आहे. पुढे आणखी चार महिने काढायचे आहेत त्यामुळे राज्य सरकारने आताच चारा छावण्या आणि दुष्काळाच्या उपाययोजना सुरु केल्या पाहीजेत असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पुणे | 25 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष होता. निवडणूक चिन्ह मिळाल्याने आता पक्षात उत्साह पसरला आहे. पक्षाला नावही मिळू नये आणि चिन्ह मिळू नये असा युक्तीवाद सुप्रीम कोर्टात केला होता. परंतू कोर्टाने त्यांचे न ऐकता चिन्ह देण्यास सांगितले त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पुण्यात ड्रग्जचा साठा सापडल्याने या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे अपयश आहे. त्यांनी राज्यांचा ‘उडता पंजाब’च्या धर्तीवर ‘उडता महाराष्ट्र’ केला आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छोट्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपात घ्या असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे, यासंदर्भात विचारले असताना सुप्रिया सुळे यांनी जे मनात आहे ते ओठात आले आहे. एनडीएच्या जास्त जवळ जातो त्याला भाजप संपवितो किंवा जास्त त्रास देतात अशी टीका केली आहे. भाजपाने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. जसं धनगर समाजाला फसविले तसं मराठा समाजाला फसविण्याचे काम सुरु असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.