तोंडाला पानं पुसू नका, शेतकरी खवळलाय; अयोध्या शक्तीप्रदर्शनावर राऊतांचा टोला
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या शिंदे-फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा गट रामाचं दर्शन घ्यायला गेलाच नव्हता. ते शक्तीप्रदर्शनासाठी गेले होते, असं म्हणत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत
मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे हाहाकार माजला आहे. अवकाळीसह गारपिटीने फळपिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यादरम्यान राजकर्त्यांनी शेतकऱ्यांना धीर द्यायचा सोडून अयोध्या दौरा केल्याने विरोधक चांगलेच आगपाखड करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या शिंदे-फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा गट रामाचं दर्शन घ्यायला गेलाच नव्हता. ते शक्तीप्रदर्शनासाठी गेले होते, असं म्हणत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. पण सरकार लखनऊमध्ये आहे. योगींचा पाहुणचार घेत आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात नुकसान झालं आहे. गहू, डाळिंब, द्राक्ष, भाज्या, फळं उद्ध्वस्त झाले आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांपासून अयोध्येत आहेत. असायला हरकत नाही. श्रद्धा असेल तर. पण ते तेथूनच पंचनाम्याचे आदेश देत आहेत. तसेच मी येथूनच आदेश दिले असल्याचे म्हणत आहेत. या गोष्टी दुसऱ्यांना सांगा. दिल्लीत जाऊन तुमच्या बॉसला सांगा. शेतकऱ्यांना सांगू नका. शेतकरी खवळलेत, असा इशारा त्यांनी दिला.