मागणी करण्याआधी चेहरा आरशात पहावा; बावनकुळेंची मविआवर टीका
तात्काळ पंचनामे आणि शेतकऱ्यांना मदतीच्या विरोधकांच्या मागणीचा खरपूस समाचार घेताना मविआ दुटप्पी भूमिका मांडत असते असा घणाघात त्यांनी केला
नागपूर : राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी याची मागणी विरोधक करत आहेत. अशीच मागणी आपण नागपूर आणि विदर्भासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी तात्काळ पंचनामे आणि शेतकऱ्यांना मदतीच्या विरोधकांच्या मागणीचा खरपूस समाचार घेताना मविआ दुटप्पी भूमिका मांडत असते असा घणाघात त्यांनी केला. 2005 ला पेन्शन योजना बंद केली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अर्थमंत्री होते. राष्ट्रवादी – काँग्रेस नेत्यांचे अनेक भाषणं आहेत. त्यात जुनी पेन्शन योजना बंद करा असे म्हणत आहेत. मात्र आता तेच 2023 ला तेच जुनी पेन्शनची मागणी करत आहेत. त्यांचा चेहरा त्यांनी आरशात बघावा. कर्मचाऱ्यांची मतं मिळवण्यासाठी विरोधकांची ही दुटप्पी भूमिका आहे.